भीमा नदीत सापडला २५ किलोचा कटला मासा बेगमपूरच्या मच्छी मार्केटमध्ये नागरिकांची पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

 

मोहोळ तालुक्यातील मत्स्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या बेगमपूर येथे शुक्रवारी भीमा नदीत मासेमारी करताना तब्बल २५ किलो वजनाचा महाकाय कटला मासा जाळ्यात अडकल्याने परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली. एवढ्या मोठ्या आकाराचा कटला प्रथमच सापडल्याचा दावा स्थानिक मत्स्यीमारांनी केला असून, हा मासा पाहण्यासाठी बेगमपूर मच्छी मार्केटमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली.


मत्स्यीमार सिंदू मोई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी भीमा नदीत नेहमीप्रमाणे जाळे टाकले होते. काही वेळाने जाळे ओढताना असामान्य वजन जाणवल्याने सर्वांनी मिळून मोठ्या प्रयत्नांनी जाळे किनाऱ्यावर आणले.




त्यावेळी त्यामध्ये तब्बल २५ किलो वजनाचा विशाल कटला मासा अडकलेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुष्काळामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी असतानाही एवढा मोठा मासा सापडल्याने मत्स्यीमारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर हा मासा बेगमपूरच्या मच्छी मार्केटमध्ये आणण्यात आला. त्याला पाहण्यासाठी आणि छायाचित्रे काढण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी सोशल मीडियावर या महाकाय माशाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याने हा मासा चर्चेचा विषय ठरला आहे.


स्थानिक ज्येष्ठ मत्स्यीमारांच्या मते, बेगमपूर परिसरात यापूर्वी अनेक मोठे मासे सापडले असले तरी २५ किलो वजनाचा कटला प्रथमच जाळ्यात अडकल्याची नोंद आहे. त्यामुळे ही घटना बेगमपूरच्या मत्स्य व्यवसायाच्या इतिहासातील एक विशेष क्षण मानला जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या