*गुरुजींचाही पेपर फुटला ! ‘नीट’ नंतर आता ‘टीईटी’चा गोंधळ, परीक्षा स्थगित*
28 जून 2026
‘नीट’ पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची (महाटीईटी) प्रश्नपत्रिकाही फुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
दीड कोटी रुपयांना प्रश्नपत्रिका विकण्यासाठी दिल्लीहून आलेल्या तीन जणांना पोलिस पथकाने मुंबई-नाशिक महामार्गावरील ओवळी डोंगराळी गाव परिसरात सापळा रचून शनिवारी सकाळी अटक केली. ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी भिवंडीत पत्र परिषदेत या कारवाईची माहिती दिली.
प्रश्नपत्रिका विकण्यासाठी काही जण भिवंडीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांना मिळाली. त्यांच्या पथकाने कोनगाव येथे सापळा रचून सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या झडतीत टीईटी प्रश्नपत्रिकेचे चार सेट मिळाले. या प्रश्नपत्रिका शिक्षण विभागाकडे पाठविल्यानंतर रविवारी होणाऱ्या टीईटीच्या त्या प्रश्नपत्रिका असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. या तीन आरोपींना प्रश्नपत्रिका कुठून मिळाल्या याचा शोध घेतला जात आहे. प्रश्नपत्रिकांची छपाई आग्रा येथील एका छापखान्यात झाली. तेथूनच त्या लीक झाल्याचा संशय आहे. आरोपींचे शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशी लागेबांधे होते का? याचा तपास सुरू आहे.
*मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; एसआयटी नेमण्याचे आदेश*
टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी ठाण्याचे सह-पोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी फोनवर चर्चा करून टीईटी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढा असे सांगितले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशीही त्यांनी फोनवर चर्चा केली.
*आरोपी कोण आहेत?*
धीरज बलराज सिंग (२८, पानिपत, हरयाणा), राजीव शाव (४५, पाटणा, बिहार), आकाशकुमार सरोजकुमार (३०, पाटणा) अशी आरोपींची नावे आहेत. धीरज हा विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. राजीव व आकाशकुमार हे शिक्षित, सधन घरचे आहेत.
*शासन निर्णय येईपर्यंत परीक्षा लांबणीवर*
मुंबई : रविवारी (२८ जून) होणारी शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे शासन निर्णय येईपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. तर या पेपरफुटीमुळे राज्यभरातील ६,००,१२५ परीक्षार्थींच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
पेपर फुटीची गंभीर दखल घेतली आहे. हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कळविला आहे. जलद गतीने तपास केला जाईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
- दादा भुसे, शिक्षण मंत्री
जाहिरातीसाठी व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा
संपादक: अमर पवार
मो.9763623853

0 टिप्पण्या