स्कूल बस सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, विशेष तपासणीची पालकांची मागणी

8 जुलै 2026
घोडेश्वर नगरी न्यूज 


■मोहोळ प्रतिनिधी: बेगमपूर परिसरातील व ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व अन्य वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. बस चालकांकडे अधिकृत बॅच, वैध परवाना, वाहनांचा विमा, फिटनेस प्रमाणपत्र तसेच विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी वाहकाची नियुक्ती आहे का, याची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अनेक विद्यार्थी दररोज वाड्या-वस्त्यांवरून शाळेत ये-जा करतात. मात्र काही वाहनांमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे. शालेय वाहतुकीसाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस प्रशासन आणि शिक्षण विभाग यांनी संयुक्त विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.

चालकांचा अनुभव, वैध परवाना, अधिकृत बॅच, वाहनांचा विमा, फिटनेस, वेग नियंत्रक यंत्रणा, अग्निशामक यंत्र, प्राथमिकोपचार पेटी आणि प्रशिक्षित वाहक या सुविधा प्रत्येक शालेय वाहनात असणे आवश्यक असल्याचेही पालकांनी नमूद केले आहे.



जाहिरातीसाठी व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा संपादक: अमर पवार मो.9763623853

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या